जालना-गेल्या तीन वर्षांपासून रेवगाव येथील शेतकरी लक्ष्मण कदम यांना वेगवेगळे आदेश काढत जालनाच्या तहसीलदारांनी झुलवत ठेवले. त्यामुळे प्रकरण मिटले तर नाही उलट वाढत गेले. याचा परिणाम शेवटी शेतकऱ्याने 12 जूनला विष पिऊन आत्महत्या करण्याचे हत्यार उपसले आणि शेतातच उपोषणाला बसले. त्यानंतर स्वतः तहसीलदारांनी उपस्थित राहून 20 तारखेला आपण शेतातील नाला मोकळा करून देऊ असे लेखी आश्वासन दिले. 20 तारखेला सहा होमगार्ड ,एक पोलीस कर्मचारी घटनास्थळावर ठाण मांडून होते. परंतु सकाळी हजेरी लावून गेलेले तलाठी आणि मंडळ अधिकारी दिवसभर इकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने आपल्या परिवारातील सुमारे 20 मुलसह सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकाऱ्यांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांमार्फत तहसीलदारांना नोटीस काढून 24 तारखेला या प्रकरणात कायदेशीर कारवाई करा, अन्यथा तिथे जर बरी वाईट घटना घडली तर याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदारांवर असेल असे स्पष्ट आदेश दिले.

या आदेशामुळे गेल्या तीन वर्षांपासून जे काम करायची तहसीलदारांची इच्छा नाही ते काम आता करावे लागेल हे निश्चित झाले. त्यामुळे आज दिनांक 24 रोजी हे काम करून देण्याऐवजी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत पुन्हा नवीन आदेश काढला. हा आदेश देखील अजबच आहे. आज दिनांक 24 आहे. आणि पत्रात दिल्याप्रमाणे आज दिनांक 25 रोजी माझ्या सही शिक्क्याने हा आदेश काढण्यात आला आहे आणि दिनांक 24 रोजी दुपारी साडेतीन वाजता माझ्या समक्ष उपस्थित राहावे असे म्हटले आहे. आदेश उद्याच्या तारखेचा आणि हजर राहायचे आजच्या तारखेत? याचा संताप येईल का आश्चर्य वाटेल?

खरं तर याच तहसीलदारांनी गेल्या वर्षी देखील याच ठिकानाची पाहणी केली होती. त्यांच्यासोबत तलाठी आणि मंडल अधिकारी देखील होते. सत्य परिस्थिती पाहिल्यानंतर नाला मोकळा करून देण्याचे आश्वासनही दिले होते. परंतु कार्यालयात आल्यानंतर पुन्हा वेगळे आदेश काढले. हे आदेश देखील अजबच आहेत. स्वतः तहसीलदारांनी दोन वेळेस पाहणी केल्यानंतर पुन्हा मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना घटनास्थळाची स्थळ पाहणी करण्याचे आदेश काढले. यामध्ये मागील तीन वर्ष वाया गेले आहेत.

आता जेव्हा हे प्रकरण आपल्या हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याची मुस्कटदाबी करून त्यालाच नोटीस पाठवून गेल्या दोन वर्षांपासून पडीक असलेल्या शेतात तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे उत्पन्न न निघाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झालेला असताना त्यालाच दहा हजार रुपयांची नोटीस पाठवली आहे.

आता जिल्हाधिकाऱ्यांनीच प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिलेले असताना, हे प्रकरण आपल्या हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यामुळे तहसीलदारांनी पुन्हा ही नवीन नोटीस देऊन इतके दिवस शेतकऱ्याला झुलवत ठेवले होते . तहसीलदारांच्या या पत्रामुळे कोण जिल्हाधिकारी? मी म्हणेल तोच आदेश असाच अर्थ निघायला लागला आहे. परंतु प्रकरण निकाली न निघाल्यामुळे शेतकरी उपोषणाच्या वेळी दिलेल्या निर्णयावर ठाम आहे.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172